लोकविज्ञान : नव्या दिशा, नवी आव्हाने

स्त्रियांची मासिक पाळी  या विषयावर कोणाला जे काही राजकारण करायचे असेल ते त्यांनी करावे. मात्र ते करताना वैज्ञानिक तथ्यांची पायमल्ली होणार नाही, हे लोकविज्ञानाच्या पाठीराख्यांनी त्यांना निक्षून सांगायला हवे.

आपण मागील लेखात संकल्पना आणि चळवळ या अंगाने लोकविज्ञानाची ओळख करून घेतली. भारतातील लोकविज्ञान चळवळीचा स्वत:चा असा इतिहास आहे, कामाची दिशा आणि उद्दिष्टय़े आहेत. पण आपण या सदराच्या संदर्भात विज्ञानाचा जो व्यापक विचार करीत आहोत, त्या दृष्टीने लोकविज्ञानाला विशिष्ट पठडीत बांधून ठेवता येत नाही. लोकांना विज्ञानाभिमुख करणे, विज्ञान व वैज्ञानिक यांना लोकाभिमुख करणे आणि विज्ञानाच्या प्रक्रियेत लोकांना सामील करून घेऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान यांची निर्मिती करण्यास त्यांना सक्षम करणे ही सारी लोकविज्ञानाची कार्ये आहेत. हे एकदा आपण मान्य केले की मग ‘पाळीच्या दिवसात होणारा रक्तस्राव हा अशुद्ध व घाणेरडा असतो का?’ हा प्रश्नही मग लोकविज्ञानाचा प्रश्न बनतो. कारण ‘लोक’ शब्दात फक्त पुरुषच सामावतात असे मानणे हीदेखील वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे, हे भान आपल्याला आलेले असते.

मासिक पाळी : लोकविज्ञान भान

हे भान जेव्हा भल्या भल्या व्यक्तींना येत नाही, तेव्हा त्या ‘रक्ताने माखलेले पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी किंवा देवाच्या दारी जाणार का?’ असा प्रश्न विचारतात. सॅनिटरी पॅडचा शोध लागण्यापूर्वी हजारो वर्षांपासून स्त्रिया रक्ताने भिजलेले चिरगूट ओटीपोटाशी बांधून सर्वत्र संचार करीत आल्या आहेत.

सॅनिटरी पॅडची सोय उपलब्ध झाल्यानंतर त्या मित्रांच्या घरी, ईश्वराच्या मंदिरात, विद्येच्या देवळात, लोकशाहीच्या गाभाऱ्यात, क्रीडांगण ते समरांगण – सर्वत्र विहार करीत आहेत व त्यात कोणाला काहीही वावगे वाटत नाही. कारण मासिक पाळीत होणारा रक्तस्राव ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रियाच नव्हे, तर अवघ्या मानवजातीच्या सर्जनाचा तो आधार आहे. एखाद्या व्याधीमुळे किंवा हिंसाचारातून उद्भवणारा रक्तस्राव हा अशुद्ध व अमंगल मानता येईल. पण मासिक पाळीतून होणारा रक्तस्राव हा जगातील सर्वात नैसर्गिक (म्हणूनच मंगल-अमंगलाच्या पलीकडचा) व सर्जनशील प्रवाह आहे, असे विज्ञान सांगते. या विषयावर कोणाला जे काही राजकारण करायचे असेल ते त्यांनी करावे. मात्र ते करताना वैज्ञानिक तथ्यांची पायमल्ली होणार नाही, हे लोकविज्ञानाच्या पाठीराख्यांनी त्यांना निक्षून सांगायला हवे.

ज्ञानेश्वरी, लोकविज्ञान व मातृभाषा

लोकांना विज्ञानाभिमुख करण्यासाठी विज्ञानविषयक माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. आपण असंख्य उपकरणे वापरतो, पण त्यामागील विज्ञान मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेले नसते. आपण पैसे ओतून जे ‘शुद्ध पाणी’ विकत घेतो किंवा घरी बनवतो, ते कितपत शुद्ध असते, हे आपल्याला माहीत असते का? आपण खातो ते अन्न निर्विष आहे का? आपण ज्या प्रकारचे कपडे परिधान करतो, ते आपल्या नैसर्गिक परिसराला व आपल्या आरोग्याला अनुकूल आहेत का? असे प्रश्न आपल्याला पडावे व आपण त्यांच्या सोडवणुकीसाठी विज्ञानातील ज्ञान व दृष्टिकोन यांची मदत घ्यावी, हेच लोकविज्ञान.

सध्या हे घडत नाही, कारण ज्ञान कोणत्यातरी बोजड पुस्तकात किंवा वैज्ञानिक नियतकालिकात कुलूपबंद होऊन पडले आहे. आजच्या डिजिटल युगात त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण ते सर्वसामान्यांना माहीत नाहीत. आपण त्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून निर्मिलेली जाहिराततंत्रे काम करीत आहेत. हितसंबंध, भाषा व परिभाषा यांचा अडसर दूर करून ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य लोकविज्ञान करते. म्हणजेच, लोकविज्ञान ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘ज्ञानेश्वरी लिहिण्याची’ चळवळ आहे. हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते त्यांच्या भाषेत त्यांना समजेल या पद्धतीने न्यायला हवे. त्यासाठी विज्ञानाच्या निदान प्राथमिक संकल्पना तरी विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेतूनच पोहोचायला हव्या, असे विज्ञानच सांगते. जगदीशचंद्र बोस यांच्यापासून नारळीकर-गाडगीळांपर्यंतच्या भारतीय वैज्ञानिकांच्या सर्व पिढय़ा मातृभाषेतून शिकून ज्ञानसंपन्न झाल्या. विज्ञानाचे पदवी परीक्षेपर्यंतचे ज्ञान मराठीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल, इतपत प्रगती मराठी भाषेने नक्कीच केली आहे. मुळात, भारतीय भाषा या ज्ञान-विज्ञानवाहक भाषा व्हाव्या, यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ७-८ दशके मोठय़ा शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. आता मात्र महानगरांपासून थेट आदिवासी पाडय़ापर्यंत सर्वत्र इंग्रजी माध्यमाचे माहात्म्य पोहोचले आहे. जिल्हा परिषद ते सीबीएसई सर्वत्र पाठांतराला प्रचंड महत्त्व येऊन संकल्पनांची स्पष्टता बाजूला पडली आहे. अशा वातावरणात ही ज्ञानेश्वरी वाचणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकविज्ञान ही लोकशाहीकरणाची व जनसामान्यांच्या सबलीकरणाची चळवळही आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील केंद्रीकरण व विषमता बळकट करणाऱ्या रचना या लोकविज्ञानाचा रस्ता क्षणोक्षणी अडवीत असतात. भारतातील प्रस्थापित विज्ञानाची रचनाही अत्यंत श्रेणीबद्ध आहे. सर्वोच्च पायरीवर विज्ञानाचे व्यवस्थापक, त्यानंतर सरकारी प्रयोगशाळांमधील वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिक, मग आयआयटीसारख्या संस्थांमधील प्राध्यापक, मग अन्य वैज्ञानिक-तंत्रवैज्ञानिक, त्यानंतर अल्पप्रशिक्षित तंत्रज्ञ व सर्वात खाली प्रत्यक्ष काम करणारे मजूर अशी ही रचना आहे. यातील वरच्या पातळीवरील घटक फक्त ‘डोक्याने’ काम करतात. हाताने काम करणारे डोके वापरत नाहीत. आणि हे काम ज्याच्यासाठी करावयाचे त्या सर्वसामान्य माणसाच्या विषयीची आस्था बाळगणाऱ्या हृदयाला तर या रचनेत स्थानच नाही.

सध्या अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाचा प्रश्न भेडसावीत आहे. दुष्काळ म्हणजे काय, अवर्षण म्हणजेच दुष्काळ का? गेली अनेक वर्षे दुष्काळी परिस्थिती का निर्माण होते आहे? त्यासाठी कोणते उपाय योजायला हवे? हे सारे  केवळ शेतकऱ्यांच्या नव्हे, तर तुम्हा-आम्हा सर्वाच्याच जीवनमरणाचे प्रश्न आहेत. पण त्यावर सर्वाना सामावून घेणारी बृहत् चर्चा झडल्याचे तुम्हाला कधी आठवते? कोणी तरी परस्पर ठरवितो की मोठी धरणे बांधून प्रश्न सुटतील. हजारो कोटी रुपये खर्च झाल्यावर जेव्हा जमिनीला तडे पडतात आणि पिण्याच्या पाण्याची ट्रेन नेण्याची वेळ येते, तेव्हा कोणी ‘जलयुक्त शिवार’ हा रामबाण उपाय असल्याचे सांगतो. मग मराठवाडय़ात त्या आधारावर एकीकडे उसाची शेते डुलतात, कोणी विहिरीतून उपसा करून लाखो लिटरचे शेततळे उभारतो, तर दुसरीकडे जमिनीतील पाणी आणखी खोल जाते. हे निर्णय जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संघटना, राजकीय नेते, त्यांचे कर्ते-करविते, कंत्राटदार व सरकारी अधिकारी हे सर्व मिळून घेतात. पण हा ज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, तो शेतकरी या प्रक्रियेत कोठेच नसतो. शेतकरी बाई जर या प्रक्रियेत आली, तरच या प्रश्नावर काही ठोस, तसेच शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करता येईल, असे लोकविज्ञान सांगते. त्यासाठी देशात व परदेशात सामान्य शेतकऱ्यांनी, तसेच ग्रामीण तंत्रज्ञांनी शोधलेले उपायही ते सर्वासमोर मांडते. कारण सर्वसामान्य जनतेच्या कर्तृत्वावर त्याचा विश्वास आहे.

मागील काही लेखांत आपण राजस्थानमधील जल-साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती, कोलकात्याला मासेमारी करणाऱ्या निरक्षर तंत्रज्ञांनी निर्मिलेली जैविक जलशुद्धीकरणाची पद्धती अशी काही उदाहरणे पहिली. हे सारे लोकविज्ञान आहे. दुसरीकडे सुदूर चंद्रपूरच्या जंगलातील पाचगाव सामूहिकरीत्या अभ्यास व संघर्ष करून १६०० हेक्टर वनक्षेत्राच्या व्यवस्थापनेचा आपला पारंपरिक अधिकार सरकारी यंत्रणेकडून खेचून घेते आणि त्याचे नियोजन करीत असताना पारंपरिक शहाणपणाला अत्याधुनिक ‘जीपीएस’ तंत्रज्ञानाची जोड देते. आता ते जंगलातील विशिष्ट पारिस्थितीकीच्या आधारावर (पाणी, तापमान, जमीन, आसपासची जीवसृष्टी इ. घटकांचा विचार करून) कोठे कोणती झाडे लावावी याचा निर्णय घेतात. हेही लोकविज्ञान आहे. एकीकडे ते पारंपरिक शहाणपणाचा वारसा डोळसपणे वापरण्याचा आग्रह धरते, तर दुसरीकडे ते जगभरातून उपलब्ध झालेले अत्याधुनिक ज्ञान आपल्या कक्षेत आणते. विज्ञानाच्या विकासात सर्वसामान्य जनतेचीही भूमिका असू शकते असे मांडणारी, म्हणजेच विज्ञानाचा आशय व्यापक करणारी ही ‘राजकीय’ चळवळ आहे.

लोकविज्ञान हे अंतिमत: समाजपरिवर्तन घडवू पाहणारे विज्ञान आहे. झारीतील शुक्राचार्य त्याचा मार्ग अवरुद्ध करतील, हे समजण्यासारखे आहे. मात्र ही (ज्ञान) गंगा पृथ्वीवर नेणारे असंख्य भगीरथ निर्माण झाले, तर पृथ्वीवरील सर्व प्रकारचे ‘दु’ष्काळ त्यामुळे खचितच संपुष्टात येतील.

205total visits,2visits today