खामगावातील ऐतिहासिक शांतीमहोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ

खामगाव :  शतकाची  परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो.  कोजागिरी पोर्णिमेपासून ११ दिवस चालणाºया या महोत्सवात विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत असल्याने, या उत्सवाचे महत्व ११० वर्षानंतर देखील अबाधित आहे. खामगावात बुधवार २४ आॅक्टोबरपासून शांती महोत्सवास प्रारंभ होईल.

या उत्सवात जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी पौर्णिमेस मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या दिवसापासूनच पुढील अकरा दिवस हा उत्सव चालतो. विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरीता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे. त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरातील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात सन १९०८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. आंध्रप्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात बोधन  गाव आहे.  नांदेड जिल्ह्याची सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र सिमेनंतर आंध्र सिमेस प्रारंभ होतो व सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी मातेचे पुर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात आली.   कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते. बिड्याच्या व्यवसायाकरीता लागणाºया पानाच्या व्यवहाराकरीता बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मुर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत. कालांतराने ते बिड्याच्या व्यवसायाकरीता खामगाव शहरात येऊन आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला.  हीच प्रथा सुरू आहे.

दर्शनासाठी देशाच्या कानाकोपºयातून भाविकांची उपस्थिती!

या उत्सवाकरीता भक्तगण अतिश्रध्देने मुंबई, पुणे, नागपूर, तुळजापूर, बडोदा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील कानाकोपºयातून देवीच्या दर्शनाकरीता भाविक खामगाव येथे येतात. ही देवी जागृत मानली जात असल्याने भाविकांसाठी या उत्सवाचे वेगळेच असे महत्व आहे. उत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरीता २४ तास आईचा दरबार खुला असतो. दरम्यान, उत्सव काळात दहा दिवस भाविक स्त्री-पुरूष यांच्याकडून दान केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे गरजुंना वाटप केल्या जाते. मोठी देवी संस्थानचे विद्यमान विश्वस्तांपैकी जगन्नाथ आगीनकर ज्येष्ठ सदस्य आहेत आहे. त्यांच्या पहाडी आवाजातून गायलेल्या जगदंबेच्या आरत्या जोगवा सर्वांच्या स्वरातून उठून निघतात.